हजरत महंमद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन व त्यांच्या ७२ अनुयायी व कुटुंबियांनी सत्यासाठी अन्यायाविरुध्द केलेल्या बलिदानाच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी मोहरम साजरा केला जातो. ‘अलविदा हो अलविदा…शाहे शहीदा’ या शोक गीताच्या साथीत भावपूर्ण वातावरणात कुंभोज येथील हजरत शाह खताल हुसेन दर्गाह प्रांगणात गावातील पीर पंजांचे विधीवत विर्सजन झाले.
मोहरमनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दुपारी पंजे शाही मशीदीत आले. येथे बुरूज व करबलाचा खेळ झाला. यानंतर पीर पंजे मिरवणूकीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आले. येथे पंजांची अंतिम भेट झाली. फातेहा पठणानंतर विर्सजन मिरवणूकीस प्रारंभ झाला. सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी होती. दीपक चौक मार्गे पंजे दगाह प्रांगणात आले. येथे पंजांचे विधीवत विर्सजन झाले.