पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ! अन्यथा……

पावसाळा सुरू झाला की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भजी, वडे, सामोसे असे गरमागरम पदार्थ खाल्ले जातात. मात्र, या दिवसांत तब्येत बिघडायला नको असेल तर थोडी काळजी आपणच घ्यायला हवी. कुठल्या सीझनमध्ये काय खायचं आणि काय टाळायचं हे माहिती असेल तर त्या सीझनमध्ये उद्भवणाऱ्या प्रकृतीच्या छोट्याछोट्या कुरबुरी टाळायला मदत होऊ शकते.
देशाच्या बऱ्याच भागांत आता मान्सून येऊन पोहोचला आहे. पाऊस म्हटलं की आपण काय खातो आणि काय नाही याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते.

या दिवसांत येणारी पोटाची आजारपणं टाळायची असतील तर काही पदार्थ खाणं टाळलेलंच बरं.पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आपण पटकन आजारी पडतो. त्यामुळे या दिवसात प्रामुख्याने खाण्यापिण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. पावसाळा सुरु झाला की शक्यतो हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत. त्यातून बॅक्टेरिया आणि बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा भाज्यांमध्ये अळ्या, कीड लागण्याचं प्रमाणही अधिक असतं.

पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे या दिवसात मासे न खाण्याकडे मत्स्याहारींचा कल असतो. या दिवसात मासे खाल्ल्यास अन्नातून विषबाधेचा धोका असतो. त्यामुळेही मासे खाणं टाळलेलं बरं. पावसाळ्यात पचनक्रिया काहीशी मंदावलेली असते. त्यामुळे पचायला जड असलेल्या कच्च्या कोशिंबिरी, कच्चं सॅलेड खाणं टाळावं. सॅलेड किंवा कोशिंबिरीसाठी ज्या भाज्या वापरणार असाल त्या थोड्या उकळून घेतल्या तर पोटाच्या तक्रारी टाळता येतील.

पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो बाहेरचं पाणी वापरुन बनवलेले उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणं टाळावं. कारण त्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.पावसाळ्यात आरोग्य चांगलं राखायचं असेल तर घरी केलेले ताजे आणि गरम पदार्थ आहारात असावेत. सूप, भाज्या घातलेली खिचडी, मोड आलेल्या कडधान्यांचं कढण अशा पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करावा. त्याचबरोबर उकळून थंड केलेलं पाणी प्यावं, जेणेकरुन पाण्यातून होणारे त्रास टाळण्यास मदत होईल.

या दिवसांत आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करावा. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या स्वयंपाकात लसूण वापरण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. मांसाहार करणाऱ्यांनी उकडलेल्या अंड्यांचा समावेश आहारात केला असता रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. दही, ताक, इडली, डोसे, असे आंबवलेले पदार्थ आहारात योग्य प्रमाणात घेतले असता शरीराला उपयुक्त चांगले सूक्ष्मजीव (गूड बॅक्टेरिया) मिळतात. त्यांचा आरोग्य चांगलं राखण्यासाठी उपयोग होतो.