मराठा आरक्षणाची धग कायम, राज्य परिवहन महामंडळाला २ कोटींचा फटका

माराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आज सलग पाचव्या दिवशी पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे पुण्यातून मराठवाडा विदर्भ आणि सोलापूरला जाणाऱ्या ७५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे मराठवाडा विदर्भ जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पुण्यातून एसटी बसच्या दररोज १ हजार ५५६ फेऱ्यांची नियोजन केले जाते. आंदोलनामुळे ७५० फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. प्रामुख्याने बीड जिल्ह्यासह अमरावती,नागपूर,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

आकडेवारी

पुणे विभागातून सुटणाऱ्या फेऱ्या १५५६

आंदोलनामुळं रद्द झालेल्या फेऱ्या ७७०

पुणे विभागाचे आर्थिक नुकसान ४० लाख २७ हजार पेक्षा जास्त नुकसान

परभणी जिल्ह्यातही मराठा आरक्षणाची धग कायम आहे. चार दिवसांपासून परभणी, पाथरी, गंगाखेड, जिंतूर , हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या सात आगारातून धावणारी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने परभणी विभागाला पावणे दोन कोटींचा फटका बसला आहे. लाल परीची सेवा बंद असल्याने खाजगी वाहन धारकांचे मात्र अच्छे दिन आले तर प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसली आहे.