कोल्हापूर रेल्वसेवा बंद होण्याची शक्यता….

पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने मिरज ते कोल्हापूर दरम्यानची रेल्वसेवा बंद होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.रेल्वेच्या पुणे विभागाने मंगळवारी सायंकाळी याबाबतचे प्रकटन जारी केले. त्यात म्हटले आहे की, मिरज ते कोल्हापूर मार्गावरील रुकडी ते कोल्हापूर मालधक्का यादरम्यानचा पंचगंगा नदीवरील रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी पुलाजवळ धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत आहे.

राधानगरी धरणातून आणखी पाणी सोडल्यास आणि पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वेगाड्या बंद कराव्या लागतील. यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शनमधील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. कोल्हापुरातून एकही रेल्वे सुटू शकणार नाही.