इचलकरंजीतील शहापूर स्मशानभूमीत सुविधांचा अभाव

इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या शहापूर स्मशानभूमीला विविध समस्यांनी घेरले आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तेव्हा शहापूर स्मशानभूमीत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी माफक अपेक्षा शहरवासियांतून होत आहे. महानगरपालिकेच्यावतीने पंचगंगा नदीतिरावर तसेच शहापूर हद्दीत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था केली आहे. शहापूर परिसरातील नागरिक शहापूर हद्दीत असलेल्या स्मशानभूमीचा वापर करतात.

मात्र, पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर शहराच्या हद्दीतील कोणीही व्यक्ती मयत झाल्यास अंत्यसंस्कारासाठी शहापूर स्मशानभूमीत न्यावे लागते. मात्र त्याठिकाणी वेळच्यावेळी साफसफाई केली जात नसल्याने कचऱ्याचे ढिग साचले जातात, पाण्याची व्यवस्था नसल्याने येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र आधार घ्यावा लागतो. तसेच येणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी साधी बसण्याची व्यवस्थाही केली नसल्याने आलेल्या नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते.

या संदर्भात परिसरातील नागरिक, माजी नगरसेवक, विविध संघटनेच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन, तक्रार करूनही त्या ठिकाणी सुविधा केल्या जात नाहीत. शहापूर स्मशानभूमीचा प्रामुख्याने पावसाळी दिवसात महापूर आल्यानंतर वापर केला जातो. मात्र त्या ठिकाणी समस्यांचा आगार बनल्याने येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यां तोंड द्यावे लागते. तेव्हा याबाबत आयुक्तांनी लक्ष देवून त्याठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.