अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गावोगावी शहरी ठिकाणी खून, मारामारी, चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या घरे फोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अधिकच वाढ होत चाललेली आहे. अशातच आता इचलकरंजी शहरातील आठवडा बाजारांमध्ये चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. भुरट्या चोरांचे प्रमाण वाढलेले असून याला कधी आळा बसणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. चार लाख वस्तीच्या गावांमध्ये अनेक ठिकाणी आठवडा बाजारांची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये थोरात चौक, विकली मार्केट, अण्णा रामगोंडा शाळेसमोरील मार्केट, शहापूर चौक, भोनेमाळ, स्वामी आपारमेंट मार्केट, वडगाव बाजार समिती मार्केट आदींचा समावेश आहे.
या ठिकाणीही शुक्रवारी तसेच मंगळवारी आठवडा बाजार भरतो. तसेच इतर दिवशी देखील बाजार भरत असतो. या बाजारांमध्येच शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला भाजीपाला विक्रीसाठी आणतात. तसेच व्यापाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. मात्र या मार्केटमध्ये भुरट्या चोरांचे प्रमाण वाढलेले आहे. महिलांचे पर्स, मोबाईल, सायकल, पिशव्या, मोटर सायकल यांच्या चोऱ्या केल्या जात आहेत.
बाजारात पोलीस नसल्याने त्यांचा फायदा चोर उठवत आहेत. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी एखादा पोलीस कर्मचारी ठेवल्यास चोरांच्यावर आळा बसेल आणि ग्राहकांच्या चोऱ्या कमी होण्यास मदत होईल तसेच चोरीसारख्या घटनांना पायबंद बसेल असे नागरिकांमधून बोलले जात आहे.