महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि कोकणात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. पुण्यात तर पावसाने अक्षरशः कहर केला होता. त्यामुळे पुण्यात एमडीआरएफची टीम आणि लष्कराला मदतीसाठी उतरावे लागले होते. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु आज रेड अलर्ट दिल्यामुळे पुण्यासह राज्यातील आठ जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात आज तसेच उद्या देखील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका,
अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.