पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांची मांदियाळी पाहण्यास मिळाली. लाखो भाविकांनी पंढरपुरात येऊन विठू माउलीचे दर्शन घेतले. भाविकांच्या सोयीसाठी २४ तास दर्शनाची सुविधा करण्यात आली होती.दरम्यान प्रक्षाळ पूजेने आज आषाढीची सांगता होत असून याच दरम्यान आजपासून देवाचे २४ तास पदस्पर्श दर्शन बंद होणार आहे.
प्रक्षाळ पूजेत आज दुपारी १२ वाजता देवाला पहिले स्नान घातले जाईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता दुसरे स्नान घालण्यात येते. या दरम्यान दिवसभर देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून थकवा कमी केला जातो. तर रात्री विविध वनस्पतींचा काढा दाखवला जातो.
प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने आज विविध फुलांची सजावट केली आहे. हि प्रक्षाळ पूजा पूर्ण झाल्यानंतर आषाढी यात्रेचा समारोप करण्यात येत असून भाविकांसाठी खुले करण्यात आलेले २४ तास दर्शन देखील आजपासून बंद करण्यात आले आहे.