सध्या सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कधी रिपरिप तर कधी जोरदार पावसाची हजेरी अनेक भागांमध्ये लागत आहे. अशातच कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे अनेक कुटुंबांचे स्थलांतर देखील अनेक शाळांमध्ये तसेच अन्य ठिकाणी करण्यात आलेले आहेत.
दोन दिवस पावसाने थोडीफार उघडीत घेतली त्यानंतर आज परत पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढलेली पाहायला मिळते. अशातच अनेक भागांमध्ये रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळते. त्यामध्ये पाणी साठून राहिल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सांगली कोल्हापूर रोडवरील रामलिंग फाटा ते मजले फाट्यापर्यंत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. हातकणंगले बसस्थानक ते मानाचा फाकड्या पुलाजवळ दोन दोन फूट खड्ड्यातून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे वाहनधारकांना खड्डा हा नेमका किती खोल आहे याचा अंदाज येत नाही त्यामुळे चाचपडतच वाहन चालवावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या खड्ड्यातील पाण्याचा निचरा करून चांगला मुरूम टाकावा आणि होणारी वाहनधारकांची गैरसोय दूर करावी अशी सध्या मागणी जोर धरू लागली आहे.