खानापूर -आटपाडीत महायुतीतच लढत होण्याची चिन्हे….

विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होण्याची चिन्हे बहुसंख्य मतदार संघामध्ये दिसत असताना खानापूर-आटपाडीमध्ये मात्र महायुतीत असलेल्या बाबर-पाटील या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यामध्येच चुरशीची लढत होईल असे दिसत आहे.या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल बाबर यांच्या निधनानंतर बाबर गटाची धुरा त्यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे आली असून त्यांची लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याशी सामना होताना दिसत आहे. दोन्ही गटाकडून विधानसभेची जय्यत तयारी सुरू असून यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आटपाडीची ताकद आंबड म्हणून कोणाच्या पारड्यात पडते यावर बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत.


अनिल बाबर यांचे वारसदार आणि खानापूर-आटपाडीची हक्काची जागा म्हणून याठिकाणी शिवसेनेचाच प्राधान्याने हक्क राहणार असल्याने पाटील यांच्यासाठी महायुतीतून हा मतदार संघ मिळणार का हा खरा प्रश्‍न आहे. मात्र कोणत्याही स्थितीत मैदानात उतरायचेच यासाठी पाटील यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आटपाडीच्या विकास कामात लक्ष देत असतानाच तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातही त्यांचा राबता वाढला आहे. विटा नगरपालिकेवर पाटील गटाचे तर ग्रामीण भागात बाबर गटाचे वर्चस्व आतापर्यंत राहिले असून स्वच्छता अभियानात विटा नगरपालिकेने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला होता. यामुळे सामाजिक कामाचा पाटील घराण्यालाही वारसा अगदी स्व.हणमंतराव पाटील यांच्यापासून आहे. त्यामुळे राजकीय घराण्यातून येणार्‍या बाबर-पाटील या पारंपारिक राजकीय विरोधकांतील या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार असे दिसते.


या मतदार संघामध्ये आटपाडीतील देशमुख यांचा गट कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतो यावरही यामतदार संघाचे राजकीय गणित निश्‍चित होणार आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितपवार गट यांच्यात जागा मिळविण्यासाठी चढाओढ तर राहणारच पण याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरही या मतदार संघासाठी आग्रही असून त्यांनीही तयारी सुरू केली आहे. म्हणजे महायुतीत घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खानापूर-आटपाडीसाठी आग्रह राहणार आहे. महाविकास आघाडीत मात्र, या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद मर्यादित दिसत आहे. यामुळे शिवसेना उबाठा गटाला ही जागा मिळण्याची चिन्हे आहेत. उबाठा शिवसेनेने तसा दावाही केला आहे. मात्र, कितीही उमेदवार मेदानात आले तरी पक्ष बाजूला ठेवून बाबर-पाटील असाच सामना रंगणार हे लोकांनीही आता गृहित धरले आहे.