पूरनियंत्रण प्रकल्प कामास तात्काळ सुरुवात करा मुख्यमंत्र्यांचा आदेश

सांगली, कोल्हापूरमधील पूर नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून, त्यासाठी एमआरडीपी प्रकल्पास तातडीने निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. या कामास तातडीने सुरुवात होणे गरजेचे आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त होईपर्यंत कृष्णा खोरे विकास महामंडळकडे उपलब्ध असणाऱ्या निधीतून २५ टक्के निधी खर्च करण्यास मान्यता द्यावी. बँकेचा निधी प्राप्त होता ही रक्कम कृष्णा खोरे विकास महामंडळाला रेट्रो ॲक्टिव्ह फायनान्सिंगद्वारे परत करता येईल.

त्यामुळे पूर नियंत्रणाचा एमआरडीपी प्रोजेक्ट तातडीने सुरू करणे शक्य होईल अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली. मित्रा संस्थेची बैठक मुंबई येथे पार पडली. यामध्ये संस्थेचे उपाध्‍यक्ष आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील महापुराच्या उपाययोजनांची चर्चा केली.

जागतिक बँकेचा निधी उपलब्ध होईपर्यंत कृष्णा खोरे महामंडळाकडून निधी घ्यावा आणि नंतर तो परत करावा, असा प्रस्ताव मांडला. याला मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली. कोणत्याही परिस्थितीमध्ये महापूर उपाययोजनांच्या कामाला तत्काळ सुरुवात करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.