सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत प्रत्येक पक्ष आपापली दिशा ठरवत आहे. उमेदवारीवरून अनेक बैठका, सभा घेण्याचे काम सुरु झालेले आहे. अशातच सगळीकडे विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होण्याची चिन्हे बहुसंख्य मतदार संघामध्ये दिसत असताना खानापूर-आटपाडीमध्ये मात्र महायुतीत असलेल्या बाबर-पाटील या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यामध्येच चुरशीची लढत होईल असे दिसत आहे.
या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल बाबर यांच्या निधनानंतर बाबर गटाची धुरा त्यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे आली असून त्यांची लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याशी सामना होताना दिसत आहे. दोन्ही गटाकडून विधानसभेची जय्यत तयारी सुरू असून यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आटपाडीची ताकद आमदार म्हणून कोणाच्या पारड्यात पडते यावर बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत.