प्रत्येक गावात पर्जन्यमापक बसविण्याची आमदार सुहास भैया बाबर यांनी अधिवेशनात केली मागणी

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये २०२४-२५ च्या पुरवणी मागण्यांवर पीक विमा विषयावर आमदार सुहास बाबर यांनी आपली मागणी मांडली. विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी मंडळाच्या मुख्य ठिकाणाऐवजी गावा-गावात पर्जन्यमापक यंत्रे बसवावीत, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत केली.ते म्हणाले, सध्या तालुकास्तरावर प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी पर्जन्यमापक केंद्र आहेत परंतू, अवकाळी पाऊस जर पडला तर पिक विमा कंपन्या मंडळाच्या ठिकाणी पडलेला पाऊस ग्राह्य न धरता गावात किती प्रमाणात पाऊस पडला, याची माहिती घेऊन पीक नुकसानीची भरपाईबाबत प्रस्ताव घेतात. त्यामुळे तशा परिस्थितीत पिक विम्याची रक्कम देण्यासाठी पिक विमा कंपन्या टाळाटाळ करतात. कधी कधी ही रक्कम मिळण्यासाठी या कंपन्यांबरोबर शेतकऱ्यांची संघर्षाची स्थिती निर्माण होते.

हे टाळण्यासाठी मंडळाच्या मुख्य ठिकाणाबरोबरच प्रत्येक गावात पर्जन्यमापक केंद्रे बसवावेत. जेणेकरून कोणत्या परिसरात किती पाऊस पडला याची नोंद होईल. व अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, याची माहिती कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाला मिळू शकेल, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, खानापूर तालुक्यात पाणी परीक्षण, माती परीक्षण केंद्रे राज्य शासनाच्या वतीने उभारण्यात यावे, कृषी विभागाचे लकी ड्रॉ गेल्या दोन वर्षापासून पेंडिंग आहेत.

ते लवकरात लवकर निघावेत, ट्रॅक्टरला दोन लाख रुपये किमान अनुदान द्यावे, खानापूर-आटपाडी किंबहुना संपूर्ण माणदेशामध्ये खिलार जनावरांची पैदास होते. राज्याच्या गोशाळा संवर्धन योजनेमध्ये खानापूर मतदारसंघात खिलार जनावर संवर्धन केंद्र उभा करावे, अशाही मागण्या बाबर यांनी यावेळी केल्या.