पूरग्रस्तांनी अधिकाऱ्यांना घातले कोंडून…

शिरढोण येथील पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना सेवा मिळावी, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी, पूरबाधित पिकांचा पंचनामा केला जावा, या मागणीसाठी कृती समितीने सोमवारी सकाळी येथील गाव चावडीसमोर धरणे आंदोलन केले होते. यावेळी पूरग्रस्त आणि अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याने संतापलेल्या पूरग्रस्तांनी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, तलाठी, कृषिसेवक, आरोग्य सेवक, मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना तलाठी कार्यालयात कोंडून घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आदोलक सासणे यांना बोलण्यास अटकाव केल्याने संतप्त आंदोलक महिलांनी कार्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांना कोंडून घालत गाव चावडीला कडी घातली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. आंदोलनाची तीव्रता ओळखून तहसीलदार अनिलकुमार हेळकर, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस आंदोलनस्थळी आले. तहसीलदार हेळकर यांनी आदोलकांचे म्हणणे ऐकून तलाठी व मंडल अधिकारी यांना पूररेषा निश्चित करून पीक पंचनामा करण्याचे आदेश दिले. स्थलांतरित लोकांची व जनावरांच्या चाऱ्यांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले.