लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध प्रत्येक पक्षाला लागून राहिलेले आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण हे आता खूपच रंजक वळणावर पोहोचलेले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी महायुतीला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी गनिमी काव्याने व्युहरचना आखत आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजितदादा पवार गट आहे. त्यांनी आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. खानापूर मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर हे लोकप्रतिनिधित्व करत आहेत. बाबर गटाची धुरा आता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहासभैया बाबर यांच्यावर आलेली आहे. त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली असून त्यांनी आमदारकीच्या दृष्टीने मतदारसंघात साखरपेरणी देखील सुरू केलेली आहे.
महाविकास आघाडीच्या विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपात खानापूर विधानसभा मतदारसंघ उबाटा शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ उबाटा शिवसेनेकडे राहणार आहे. तर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील राजकीय वाटचाल सुरू ठेवत विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार केलेला आहे.
मात्र महायुतीतून उमेदवारी ही सुहासभैया बाबर यांनाच मिळणार आहे त्यामुळे वैभव पाटील यांना निवडणूक लढवायची झाल्यास शिवसेना उबाटा किंवा राष्ट्रवादी हे दोन पर्याय आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वैभव पाटील नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.