सांगोल्यात गणेशमूर्तीना रंगरंगोटी करण्यास गती!

येत्या शनिवार ७ सप्टेंबर पासून सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात राजस्थानी कारागिराकडून लहान मोठ्या आकर्षक गणेशमुर्ती बनवून तयार झाल्या आहेत. कारागीर गणेश मुर्त्यांना रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहेत. यंदाही कुंभार कुटुंबीयांनी दगडुशेठ, अष्टविनायक, लालबागचा राजा, सिंहासन कपाटावर व आडवा बसलेला, फेटा बांधलेला, गादीवर बसलेला, बाहुबली, कृष्ण, अशा अर्धा फुट ते सहा फुट उंचीच्या सुमारे १ हजार देवदेवतांच्या विविध रुप व आकारातील विघ्नहर्त्याच्या आकर्षक मुर्त्या बनवल्या आहेत.

गणेशोत्वापुर्वी गणेश मूर्तीना रंगरंगोटी करुन विक्रीसाठी राजस्थानी कारागिर अहोरात्र मेहनत घेत आहेत. लोकप्रिय व लाडका गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येवून ठेपल्याने सांगोल्यात राजस्थानी कारागीर तसेच ग्रामीण भागातील कुंभार वाड्यात मुर्तीकार विविध विघ्नहर्त्याच्या रुपातील व आकारातील तयार झालेल्या आकर्षक गणेश मूर्तीना रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहेत. यंदाही दमदार पावसाअभावी सांगोला तालुक्यातील नद्या, नाले, ओढे अद्याप कोरड्या आहेत. त्यामुळे मोठ्या उंचीच्या मुर्ती विक्री होतात की नाही ? याची चिंता राजस्थानी कारागिरांना आहे. गतवर्षीच्या तुलनेत मुर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात यावर्षी काही अंशी वाढ झाली असलीतरी मुर्तीच्या दरात कोणतीही दरवाढ केली जाणार नसल्याचे राजस्थानी कारागिर गंगाराम कुंभार यांनी सांगितले.