स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे संपर्क कार्यालय असलेल्या शिवसेना भवनला श्रावणी सोमवारी अत्यंत धार्मिक स्वरूप आले होते. गावोगावहून भजनी मंडळी या ठिकाणी येवून भजन सादर करत पांडुरंगाचा गजर करत होती. यावेळी स्व. शोभाकाकी बाबर व स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांना पुष्पांजली अर्पण करण्यात येत होती. स्व. शोभाकाकी बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त बाबर कुटुंबियांच्यावतीने तालुक्यातील सर्व भजनी मंडळाना पक्वाज, मृदुंग, सुरपेटी व टाळ या साहित्याचे वाटप जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर व माजी जिल्हा परिषद् उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते करण्यात आले.
काकींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मागील वर्षी -आंब्याच्या वृक्षांचे वाटप केले होते. माझी आई ही अत्यंत धार्मिक वृत्तीची होती. पांडुरंगाचे आणि तिचे अतुट नाते होते. जग सोडून जाण्यापूर्वी देखिल ती पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन आली होती. आज आम्ही तिच्या स्मरणार्थ भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे. या माध्यमातून आमच्या आईच्या स्मृती चिरंतन रहाव्यात. तिला देवाची आस होती ती जिथे कुठे असेल तिथे तिची आणि देवाची भेट व्हावी, अशी आमची प्रार्थना आहे, असे भावनिक उदगार काढत खानापूर आणि आटपाडी तालुक्यात एक एक वारकरी भवन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.
येत्या काळात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून खानापूर तालुक्यासाठी एक आणि आटपाडी तालुक्यासाठी एक सुसज्ज असे वारकरी भवन उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सुहास बाबर यांनी सांगितले.