कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, तसेच गडहिंग्लज तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या वारंवार कोरड्या पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याती ऊस आणि भाजीपाला उत्पादन घेत असलेल्या नदी काठच्या गावांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मागच्या महिनाभरात तिसऱ्यांदा पंचगंगा आणि दुधगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे ऊस आणि भाजीपाला उत्पादनावर परिणाम होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही शेतकऱ्यांच्या विहीरींना आणि कुपनलिकांनाही पाणी कमी आल्याने पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.
शिरोळ तालुक्यात कृष्णा, दूधगंगा नदीच्या पाठोपाठ पंचगंगा नदीचेही पात्र कोरडे पडले आहे. दोन दिवसांपासून नांदणी (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने उसासह भाजीपाला धोक्यात आला आहे. त्यामुळे नांदणी व धरणगुत्ती परिसरातील शेतकरी कोंडीत अडकले आहेत.