शासनाने एक राज्य एक गणवेश या धोरणाचा अवलंब करण्याचे निश्चित केले होते आणि त्यानुसार समग्र शिक्षा अंतर्गत सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 384 शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत उपलब्ध करून दिला जाणार होता. तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली होती.
परंतु पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळाली मात्र गणवेश मिळाला नाही आणि त्यामुळेच पालकावर्गातून तीव्र भावना व्यक्त होत आहे. शासनाने जरी घोषणा केली असली तरी अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश हे पोहोचलेच नाही त्यामुळे आजही विद्यार्थी हे गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार का? असा संतप्त सवाल सध्या पालक वर्गातून उपस्थित केला जात असताना शालेय गणवेश बाबत हालचाली दिसून येत नसल्याने यंदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन हा शालेय गणवेश विना साजरा होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हे शासनाने तातडीने विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सध्या विद्यार्थ्यांमधून व पालकवर्गातून जोर धरू लागलेली आहे.