इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! हातकणंगले आणि शिरोळमधूनही……

सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. इचलकरंजीमधून विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या मुलाची उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल आवाडे हेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी घोषणा आज प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे महायुतीला पाठिंबा दिलेला असतानाही प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या निर्णयाने भूवया उंचावल्या आहेत. पक्ष कोणता असेल याची चर्चा करण्यापेक्षा राहुल आवाडे हेच इचलकरंजीमधून उमेदवार असतील.

कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये कोणतीही संभ्रमावस्था राहू नये यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आवडे यांनी आपला निर्णय जाहीर करताना सांगितले. ते म्हणाले की, मागील वेळी सुद्धा मी स्वतःच लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे भाजपचे पाठीशी उभा असल्याचं प्रकाश आवाडे यांनी नमूद केले. माझ्या निर्णयाबाबत वरिष्ठांना माहिती दिली असल्याचेही प्रकाश आवाडे यांनी सांगितलं.

उमेदवारी संदर्भात कोणताही वेळ घालवायला नको. कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. राहुल आवाडे यांचं काम घरोघरी पोहोचवण्याचं काम सुरू असून कोणत्याही प्रकारे संभ्रमावस्था नको म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आवाडे म्हणाले. त्यामुळे आता  कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित झाल्याचे चित्र आहे. आवाडे यांनी इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळमधून उमेदवार देण्याचे सुतोवाच केले आहेत.