कोल्हापुरात सख्ख्या बहिण भावाची राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट

अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही भावडांनी आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे.  

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी या सख्ख्या भावडांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. हे दोघेही अविवाहित असून अविवाहित होते. आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचं अडीच महिन्यांपूर्वी मे महिन्यांत निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते.

त्यांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.दरम्यान, आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून संभाजीनगर परिसरातील सीमा हरिश ढाले यांनी आज (15 ऑगस्ट) सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वी त्यांचे पती हरीश विष्णू ढाले यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आत्महत्येची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.