आटपाडी तालुक्यातील टँकर बंद! पाण्याची भीषण टंचाई

आटपाडी तालुक्यातील उंबरगाव येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने सुरू असलेले टँकर बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे तर अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे. यापूर्वी उंबरगावात प्रशासनाकडून खाजगी दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सध्या एकच शासनाचा टँकर मिळत आहे संपूर्ण गावाची तहान एकाच टँकरवर कशी भागणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळी विहिरीतून शेंदून पाणी काढण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असते पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली असते.
उंबरगाव परिसरात पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे विहिरीच्या पाणी पातळी ही खालावल्या आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत हीअल्प प्रमाणातच पाणी असते परंतु प्रशासनाने विहिरीत साठवून ठेवलेले पाणी पाहून सुरू असलेले टँकर बंद केले असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. उंबरगाव येथे लवकर टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.