वाळवा तालुक्यातील आष्टा शहरात शनिवारी सायंकाळी सुमारे दीड तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शनिवारी सायंकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले होते. संततधार पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी, नागाव, मिरजवाडी, ढवळी, पोखर्णी, फाळकेवाडीसह परिसरात जोरदार पाऊस झाला. शहरातील जनजीवन ठप्प झाले होते. इस्लामपूर शहरासह परिसराला शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सात वाजता सुरू झालेल्या पावसाने तब्बल दीड-दोन तास आपली संततधार तुटू दिली नव्हती. त्यामुळे शहराच्या सखल भागात पाणीच पाणी होत संपूर्ण परिसर जलमय झाल्याचे चित्र होते.
शनिवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घातला होता. दोन दिवसांची उघडीप दिल्यानंतर शनिवारी पुन्हा मेघराजाने कमाल दाखवली. सायंकाळी ७ च्या सुमारास पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस जवळपास दोन तास बरसत राहिला. यामुळे जयहिंद चित्रमंदिर, कोकोस चौक, मंडले प्लॉट, शाहूनगर, आष्टा नाका, कापूसखेड रस्ता असा सर्व परिसर जलमय झाला होता. या सर्व परिसरात गुडघाभरहून अधिक उंचीच्या पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहत होते. त्यातूनच वाहनधारक जात होते.