एनआयएची मोठी कारवाई , पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणी 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) शी संबंधित कटात सहभागी असलेल्या सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवादाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराशी संबंधित कारवाया पुढे नेण्याच्या उद्देशाने आरोपी दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करणे आणि गोळा करण्यात गुंतले होते. त्याचप्रमाणे हे आरोपी प्रशिक्षण शिबिरे देखील आयोजित करत होती. त्यामध्ये  ज्ञात आणि वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि सुधारित स्फोटके तयार करण्यासाठीची पूर्वतयारी केली जात असल्याचं देखील आढळून आले आहे. 

दरम्यान त्यांच्याकडे इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी), बंदुक आणि दारूगोळा देखील सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींवर विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कायद्यांअर्तगत हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये एकूण सात आरोपींचा समावेश आहे.  मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान,  मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी,  कदीर दस्तगीर पठाण,  सीमाब नसिरुद्दीन काझी,  झुल्फिकार अली बडोदावाला,  शमील साकिब नाचन आणि  आकीफ अतीक नाचन अशी या आरोपींची नावे आहेत. 

दहशतवादी कारवाया करण्याचा रचला होता कट

आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आलीये. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. तसेच एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस  हँडलर्सचा सहभाग असल्याचं उघड करण्यात आलं आहे.   भारतामध्ये ISIS च्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झालं आहे.