वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये सर्वच सण अतिशय उत्साहात, धुमधडाक्यात साजरे केले जाते. दिपावली पूर्वी शहर परिसरात मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबई, पुणे नंतर इचलकरंजीत विविध रुपातील भव्य आणि दिव्य गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा सरार्सपणे सार्वजनिक मंडळांकडून केली जाते. गणेश मंडळाबरोबर घरगुती गणपती मूर्तीला मोठी मागणी असते.
इचलकरंजी शहर परिसरात कराड, बेलवडे, उंब्रज, माधवनगर, सांगली, कोल्हापूर आदींसह हुपरी, रेंदाळ, शहापूरमधून मूर्तींना मोठी मागणी असते. श्री प्रभूराम, श्री स्वामी समर्थ, श्री संत बाळूमामा, श्री कृष्ण, श्री पवनपुत्र हनुमान आदी रुपातील गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे.
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होत आहे. आगमनासाठी अवघे २० दिवस उरल्याने शहर परिसरात गणेशमूर्तीचे स्टॉल सजू लागले आहेत. विविध रूपातील आकर्षक ‘श्रीं’ची मूर्ती बाजारपेठेत येवू लागल्या आहेत. गतवर्षापेक्षा यंदा २० ते २५ टक्के मूर्तीची किंमत वाढली आहे. किंमती वाढल्या असल्यातरी आतापासूनच ग्राहक मूर्ती बुकींग करत असल्याचे दिसून येत आहे. यंदा मूर्ती करण्यासाठी लागणारा कच्चामाल, मजूरी, रंग व प्लास्टर वाढलेले दरामुळे गतवर्षीपेक्षा २० ते २५ टक्के किंमत वाढलेली आहे. तरी सुध्दा गणेशमूर्तीना चांगली मागणी असल्याचे मूर्ती विक्रेत्यांकडून बोलले जात आहे.
इचलकरंजी शहर परिसरात गणेशोत्सव दिमाखदार, उत्साहाच्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सव पाहण्यासाठी सीमावर्ती भागासह आसपासच्या ग्रामीण भागातून नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने येत असतात.