इचलकरंजी शहर उद्योगनगरी म्हणून परिचित आहे. वस्त्रोद्योगाबरोबर इतर लहान- मोठ्या उद्योगाची संख्या लक्षणीय आहे. शहर परिसरात दररोज शेकडो ट्रक सूताचे येतात त्याचप्रमाणात कापडाचे ट्रक बाहेर राज्यात जातात. त्याचबरोबर इतर उद्योगाला लागणाऱ्या साहित्याची वाहने मोठ्या प्रमाणात येत असतात. काही ठराविक वेळेला अवजड वाहनांना परवानगी असताना दिवसभर शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर अवजड वाहने दिसून येतात. तेव्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक नियंत्रण कक्षाने अवजड वाहनांसाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणीसाठी कायमस्वरूपी कार्यवाही करावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
इचलकरंजी शहर परिसरात ओव्हरलोड, अवजड वाहनांचा प्रश्न जठील बनत चालला आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. मात्र, अवजड वाहन चालकांना म्हणावी, तशी शिस्त लागत नसल्याचे दिसून येते. ओव्हरलोड व अवजड वाहनांमुळे आजअखेर अनेक लहान-मोठे अपघात होऊन अनेक आपल्या जीव गमवावा लागला. तर अनेकजणांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी नव्याने वाहतूक आराखडा तयार करण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अवजड वाहनांचा त्रास कमी होताना दिसून येत नाही. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.