सांगोला विधानसभा मतदार संघात आबा- बापू आणि देशमुख बंधू……

सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोर धरू लागलेले आहे. प्रत्येक पक्षातून जोरदार तयारी सुरू देखील झालेली आहे. कोणत्या पक्षामधून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. अशातच सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील चर्चांना ऊत आलेला पाहायला मिळत आहे. म्हणजेच सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून थोडेसे वातावरण वेगळेच जाणवत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी अनेक गाव भेट तसेच जनसंवाद दौरे सुरू केलेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. तसेच विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे देखील आपण मैदान सोडणार नाहीत असा इशारा देत ते देखील विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. म्हणजेच देशमुख बंधूंमध्ये दिलजमाई होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघाची एक विशेष ओळख राहिली आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी या ठिकाणाहून इतिहास रचला आणि तब्बल 11 वेळा ते या ठिकाणहून निवडून आले आहेत. 1995 च्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांनी बाजी मारली. तर 2019 च्या निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख यांना हरवत शहाजीबापू पाटील पुन्हा या ठिकाणी आमदार पदी विराजमान झाले.

आता पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी शहाजीबापू पाटील हे प्रयत्नाची पराकष्ठा करत असताना त्यांच्या महायुतीतीलच नेत्यांची अडचण होताना दिसत आहे. काय झाडी काय डोंगरच्या माध्यमातून आमदार शहाजी बापू पाटील या मतदारसंघाची ओळख पुन्हा एकदा ठळक केली. महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेकापला सोडण्यात आला असून या ठिकाणहून बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी गतवेळी आमदार शहाजी बापूंना पाठिंबा दिल्याने त्यांचा काठावर विजय झाला होता. मात्र यंदा तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाही.

माजी आमदार साळुंखे पाटील यांनी जर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली तर शहाजीबापू पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याच्या दृष्टिकोनातून दौरे सुरू केले असून त्यांचा दौऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील मी मैदान सोडलेले नाही आणि सोडणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.