आगामी विधानसभेसाठी गणपतराव देशमुख यांच्या नातवाने जोरदार तयारी केली आहे. यासाठी थेट विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्या महुद गावात शक्तिप्रदर्शन करत विधानसभेसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिलेत.सांगोला विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने धनगर समाज आणि मराठा समाजाच्या मताधिक्याचे राजकारण चालते.
धनगर समाज आणि शेकाप पक्षाला मानणारा वर्ग आजपर्यंत गणपतराव देशमुख यांच्या मागे ठामपणे उभा होता.महाराष्ट्र विधानसभेच्या राजकारणात 50 वर्षे आमदारकीची कारकीर्द गाजवणारे गणपतराव देशमुख यांची पुढील पिढी आता राजकारणात पाऊल ठेवत आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी विधानसभा लढवली होती. मात्र त्यावेळी अनिकेत यांचा निसटता पराभव झाला.
यानंतर आता गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेकाप पक्षाच्या वतीने बाबासाहेब देशमुख यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी सांगोला विधानसभा मतदारसंघात केली आहे.एक पक्ष, एक विचार घेऊन पन्नास वर्षे राजकारण करणारे गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रातील एक आदर्श राजकीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या पाश्चात त्यांची मुले अथवा मुली कुणीही राजकारणात सक्रिय झाले नाहीत. मात्र आता आजोबांचा वारसा सांगत राजकारणात गणपतरावांचे नातू पुढे आले आहेत. नुकतीच गणपतरावांचे नातू बाबासाहेब यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सोबत घेऊन मोठी रॅली काढत महूद येथे शक्ती प्रदर्शन केले.
यानिमित्ताने राज्यातील सेलिब्रेटी आमदार अशी ओळख असणाऱ्या आमदार शहाजीबापू पाटील यांना थेट आव्हान डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिले आहे. त्यामुळे सांगोला मतदारसंघात परंपरागत असणारा पाटील आणि देशमुख यांचा सामना यंदाही विधानसभेला पहायला मिळेल.