इचलकरंजी शहरात कायदा- सुव्यवस्थेचे पालन करुन आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी महापालिकेत प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सर्वांना गणेशोत्सव अत्यंत चांगल्या आणि आनंदी वातावरणात साजरा करता यावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी योग्य पद्धतीने समन्वय साधून काम करण्याचे आवाहन केले. बैठकीस महापालिका, पोलीस, महसुल प्रशासन यासह संबंधित प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवात नागरिक देखावे तसेच गणेश मूर्ती पाहण्यासाठी बाहेर पडत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणेच्या सुचना दिल्या. शहरातील गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्ती तातडीने करणे, श्री गणेश मूर्तीना अडथळा निर्माण होत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणेचे आदेश आयुक्त दिवटे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले.
तसेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करणेच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या. तर आगमन आणि विसर्जन मिरवणुक आगमन आणि विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळा निर्माण होत असलेल्या विद्युत तारांची उंची आवश्यकतेनुसार वाढवण्यासाठी वीज मंडळ आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वय साधून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.