सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या यंत्रणा सज्ज!

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने उद्या म्हणजेच मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहापूर खण येथे यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे. तसेच शहापूर खण येथे सार्वजनिक मंडळाच्या गणेश मुर्ती विसर्जनाची व्यवस्था शहापूर हायस्कूल मागील विसर्जन स्थळ, ओपन जिम जवळ आणि बालाजी नगर पद्मा पॅलेस समोर अशा तीन ठिकाणी अध्ययावत क्रेनच्या सुविधेसह विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तसेच शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाकडील दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आधार रेस्क्यू फोर्स, पोलीस बॉइज, वीर रेस्क्यू फोर्स, पट्टीचे पोहणारे स्वयंसेवक तसेच दोन यांत्रिक बोटी, तीन क्रेन अग्निशमनवाहन, चार रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह यंत्रणा गणेश विसर्जनासाठी सज्ज करण्यात आल्या असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलेली आहे. महानगरपालिकेच्या या सर्व यंत्रणेवर उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त सोमनाथ आढाव यांचे नियंत्रण राहणार आहे.