गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करणार, असा इशारा इस्लामपूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. पहिल्याच टप्प्यात त्यांनी तंबाखूमिश्रित पानविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. शहरात बेकायदेशीर असलेल्या सर्वच उद्योगांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. बसस्थानकात पाकीटमारांचा सुळसुळाट आहे. झिरो पोलिसांची मक्तेदारी तेथे आहे.
बसस्थानकात युवकांची टोळकी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींची छेडछाड करतात. सकाळी पोलिस कर्मचारी बसस्थानक परिसरात नसतात. शहरात असलेल्या विद्यालयीन आणि महाविद्यालयीन मुलींच्या शाळेभोवती एखाद्या पोलिसाची नेमणूक करावी; जेणेकरून रोडरोमिओंचा बंदोबस्त होईल. ते दुचाकीवरून बेफामपणे जाऊन कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. एकेरी वाहतूक, वाहतूक शिस्तीचा बोजवारा उडाला आहे. उपनगरांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही गावांत गस्त घातली जात आहे.