इचलकरंजी, जुन्या एसटीपी प्लॅन्टमधून प्रक्रिया केलेले फेसाळलेले दुषित पाणी चेंबरमधून वर येऊन ओढ्यात मिसळत आहे. पुढे ओढ्यातून हे पाणी नदीत मिसळते. यामुळे नदी प्रदुषीत होऊन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी भागातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.शहरातील मैलायुक्त सांडपाणी (Sewage) सांगली नाका परिसरात असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पात एकत्र आणले जाते. येथे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाईपलाईनद्वारे शेतीसाठी वापरले जाते. मात्र, सध्या पावसाळा असल्यामुळे प्रक्रिया केलेले हे पाणी शेतीसाठीही वापरले जात नाही. परिणामी पाईपलाईनच्या चेंबरमधून फेसाळलेले पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. पाण्याला दुर्गंधी येत आहे. हे पाणी पुढे पाईपलाईनमधून ओढ्यात सोडले आहे.
फेसाळलेले पाणी थेट ओढ्यातून नदीला मिसळत असल्याने नदी प्रदुषित होऊन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मैलायुक्त सांडपाण्यामुळे कावीळ, कॉलरासारखे आजार उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे विश्वास बालीघाटे, संजय मालगावे, सुभाष चौगुले, राजू माणगावे यांच्यासह शेतकऱ्यांनी मलनिसारण प्रकल्पाच्या एअरहॉलमधून बाहेर पडणाऱ्या
पाण्याची पाहणी केली. यानंतर दुषित पाणी ओढ्यावाटे नदीत सोडून पाणी दुषित केले जात असल्याने महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी प्रदुषण मंडळाकडे केली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी टाकवडे वेस येथील एसटीपी प्रकल्पातूनही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट ओढ्यात सोडले यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गधी पसरत असल्याने याबाबत भागातील नागरिकांनी तक्रार केल्या होत्या.तेव्हा तात्पुरते आश्वासन दिले जाते त्यानंतर पुन्हा मागे तसे पुढे असाच प्रकार सतत होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
