शासनातर्फे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पुणे व ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी तीन व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड यंदा करण्यात येणार आहे. त्यातून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशात्सव मंडळांस पाच लाख, द्वितीय क्रमांकास अडीच लाख, तृतीय क्रमांकास एक लाख रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
उर्वरित ४१ जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजारांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर १ ते ३१ ऑगस्टअखेर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.