विधानसभेच्या तोंडावर शरद पवार सलग तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे सलग तीन दिवस कोल्‍हापुरात आहेत. २ सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होत असून, ४ सप्टेंबरला कोल्हापुरात त्यांचा मुक्काम आहे. ५ सप्टेंबरला सांगलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पवार यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेश तर निश्‍चित आहेच, याशिवाय अन्य काही नेतेही पक्षात प्रवेश करण्‍याची शक्यता आहे. पवार २ सप्टेंबरवला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापुरात काही काळ थांबून ते बेळगावकडे जाणार आहेत. बेळगाव येथे श्री. पवार यांच्या उपस्थितीत त्यादिवशी सहकारमहर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमानंतर ते पुन्हा कोल्हापुरात येणार आहेत. ३ सप्टेंबरला सकाळी कोल्हापुरात अन्य एक कार्यक्रम आहे, तर सायंकाळी कागल येथील गैबी चौकात होणाऱ्या जाहीर सभेत त्यांच्या उपस्थितीत समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश होणार आहे. ३ सप्टेंबरला त्यांचा मुक्काम असून, ४ सप्टेंबरला दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये त्यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार होणार आहे. यानंतर ते सातारा जिल्ह्याकडे रवाना होतील. पण, ५ सप्टेंबरला पुन्हा ते सांगलीत सोनहिरा साखर कारखान्यावर होणाऱ्या कै. पतंगराव कदम यांच्या स्मारक उद्‍घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. सांगलीतील या कार्यक्रमाला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आहे.