राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; माढ्यात मुलाला संधी देणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बबनदादांनी आपले पुत्र तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवतील, असे म्हटले आहे.त्यामुळे विधानसभेच्या आखाड्यात माढ्यातून या वेळी बबनराव शिंदे नसणार हे आता स्पष्ट झाले आहे.माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे हे सलग सहा वेळा निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून आमदार बबनराव शिंदे हे निवडणूक लढवणार नाहीत, अशी कुजबूज सुरू होती. त्यावर खुद्द बबनदादांनीच पडदा टाकला आहे. पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार शिंदे यांनी हे संकेत दिले आहेत. पंढरपूर तालुक्यातील चाळीसपेक्षा जास्त गावे ही माढा मतदारसंघासाठी जोडलेली आहेत. त्या गावांत आल्यानंतर बबनदादांनी निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले आहेत.