कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत त्यांनी पहिली चाल केली आहे.
येत्या 3 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश मुश्रीफ यांच्या दारात म्हणजेच गैबी चौकात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घाटगे यांच्याकडून शरद पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ‘वस्ताद येत आहेत’ 84 वर्षाच्या युद्ध्याला साथ देऊया, गद्दारांना गाडू या ‘मैदान तेच पण डाव नवा, अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी कागल विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या 3 सप्टेंबर रोजी त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितित कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामधील जाहीर कार्यक्रमांमध्ये प्रवेश होत आहे.
त्यामुळे या पक्षाच्या तुतारी चिन्हावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचं दिसत आहे.