गणेशोत्सव काळात मांसाहार विक्रीवर बंदी घालण्याची मागणी….

गणेशोत्सव काळात इचलकरंजी शहरातील मुख्य मार्गावर मांसाहार विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने महापालिकेचे आयुक्त, प्रांताधिकारी तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा पवित्र सण आहे. विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात आणि पावित्र राखून साजरा केला जातो. सकल हिंदू समाज या सणाच्या निमित्ताने एकत्रित येऊन धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करतात.

त्यामुळे गणेश चतुर्थी गौरी गणपती विसर्जन व अनंत चतुर्थी या दिवशी शहराच्या मुख्य मार्गावर मांसाहार विक्री करण्यास व्यापाऱ्यांना बंदी घालावी, जेणेकरुन गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले जाईल. याबाबत प्रशासनाने संबंधीत व्यावसायिकांना सक्त सूचना देऊन गणेशोत्सव काळात मांसाहार विक्री बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन महाजन (गुरुजी) सकल हिंदू समाज शहरप्रमुख निखिल ठकार यांच्यासह हिंदूप्रेमी उपस्थित होते.