७५ वर्षीय वृद्धेवर युवकाचा बलात्कार

वाळवा तालुक्यातील एका गावात ७५ वर्षांच्या वृद्धेवर युवकाने बलात्कार केल्याचा प्रकार शनिवारी घडला. संतप्त नागरिकांनी युवकाला पकडून बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सोमनाथ चंद्रकांत शिंदे (२८) या संशयिताला ताब्यात घेतले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पीडितेवर सांगली येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वृद्धा ही पुतण्याच्या कुटुंबाबरोबर राहत होती. सोमनाथ याचे वृद्धेच्या घरात येणे-जाणे होते. शनिवारी तिच्या घरातील इतर लोक बाहेर गेले होते. ती घरात एकटीच होती.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संशयित वृद्धेच्या घरात शिरला. त्याने वृद्धेवर बलात्कार केला. तिने ओरडा-ओरडा केल्याने शेजारील महिलांनी वृद्धेच्या घराकडे धाव घेतली.महिलांनी सोमनाथला पकडून चोप दिला. या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच सोमनाथला त्यांनी बेदम मारहाण केली.

लोकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सोमनाथ याला ताब्यात घेतले. वृद्धेला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.