पंढरपूर – विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते कामाला लागले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माढा विधानसभा मतदार संघात ही या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दंड थोपटले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत माढ्यात मीच आमदारकीची दहीहंडी फोडणार असं म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) आमदार बबनराव शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. गेल्या महिन्याभरापासून अभिजीत पाटील यांनी मतदार संघात गाठीभेटी आणि गाव दौरे सुरू केले आहेत.
खेळ पैठणीचा, दहीहंडी, कुस्ती स्पर्धा अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघात संपर्क दौरे सुरू केले आहेत.काल माढ्यात अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची दही हंडी मीच फोडणार असा दावा करत आमदार शिंदे यांना आव्हान दिले आहे.
आमदार बबन शिंदे हे विधानसभा निवडणूक लढवतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे हे निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे.अभिजीत पाटील हे सध्या महायुतीच्या गोठात असले तरी त्यांनी अद्याप कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट केले नाही.