आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंब सौदे बाजारात शुभम शशिकांत कोरटकर (रा. गुरसाळे ता. माळशिरस) यांच्या डाळिंबाला प्रति किलो 411 रुपये असा दर मिळाला.आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाला सध्या चांगला दर मिळत आहे. डाळिंबाची आवक देखील वाढत चालली आहे. मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्समध्ये शुभम कोरटकर यांच्या डाळिंबाला दर्जाप्रमाणे प्रतिकिलो 411, 180, 158, 123 आणि 91, असा भाव मिळाला. बिदाल (ता. माण) येथील सचिन मधुकर कुंभार यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो 100 पासून 129, 153, 169 ते 400 असा दर मिळाला. भगतवाडी (ता. इंदापूर) येथील माऊली पोपट सूर्यवंशी या शेतकर्याच्या डाळिंबाला प्रतिकिलो 52, 85, 109, 150 ते 275 रुपयेपर्यंतचा भाव मिळाला.
डाळिंब उत्पादक शेतकरी विविध नैसर्गिक अडचणीमुळे हतबल झाला आहे. मागील दोन वर्षात शेतकरी वर्ग पुन्हा डाळिंब लागवड करून पुन्हा जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून आटपाडी येथील सौदे बाजारात डाळिंबाची आवक होत आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत आटपाडी, सांगोला तालुक्यातील दर्जेदार डाळिंबाला मोठी मागणी आहे. निवडक मालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी बांधावर व्यापार्यांना डाळिंब विक्री करण्याऐवजी आटपाडी सौदे बाजारात आपल्या मालाची विक्री करावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, मंगलमूर्ती फ्रूटचे पंढरीनाथ नागणे यांनी केले आहे.