इचलकरंजी शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी आज टवाळखोर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्याच्या हेतूने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गणेशोत्सव काळात शहरात विघातक आणि विघ्नसंतोषी कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे व्हिडिओ तयार करून पोलिसांना देणाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या घोषणेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांसह उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
आमदार आवाडे यांनी, ‘बंद सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी १२ लाख तत्काळ देण्याचे जाहीर केले. यशोदा पुलाचे ५ सप्टेंबरला उद्घाटन करून आगमन व विसर्जन मार्ग सुरळीतपणे मोकळा करणार असल्याचेही सांगितले. आगमन ते विसर्जन काळात रात्री बारापर्यंत देखावे व साऊंड सिस्टिमला परवानगी देण्यात आली.
पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी केले. यावर्षीही अनंत चतुर्दशीनंतरच ईद ए मिलाद साजरा करू असा मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतल्याचे सलीम अत्तार यांनी सांगत हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन बैठकीत घडले.
मंडळाच्या मागण्या
- विसर्जनवेळी शिवतीर्थवरील कोंडीवर लक्ष द्या
- दान केलेल्या मूर्तीचे पावित्र्य राखा
- शहरातील सीसीटीव्ही सुरू करा
- मिरवणूक मार्गावर विद्युत प्रवाह खंडित नको
- गणेशोत्सवात बंद चालू रस्ते प्रसिद्ध करावे
*गणपती विसर्जनाची नोंदवही ठेवा - वीजजोडणीची डिपॉझिट रक्कम माफक करा
- खासगी केबलची उंची वाढवा
*आगमन मिरवणुकींना परवानगी द्या
प्रशासनाच्या सूचना - मंडळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
- अधिकृत वीज कनेक्शन घ्या
- मंडपात अग्नीरोधक ठेवा
*डॉल्बीचा आवाज मर्यादित असावा - कार्यक्रमात स्त्री पुरुष स्वतंत्र व्यवस्था हवी
- विसर्जनावेली बेवारस मूर्ती ठेवू नका
- विनाअडथळा साऊंड सिस्टिमची रचना करा