इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खूनप्रकरणी पाथरवट बंधूंना अटक

पूर्ववैमनस्यातून दोन भावांनी मित्राच्या मदतीने रोहित बाळू तडाखे (वय २५) याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी संदेश विनोद पाथरवट, राहुल विनोद पाथरवट, नाथा ऊर्फ शंकर पुंडलिक जावीर (तिघे रा. आसरानगर साईट नंबर १०२) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संदेश व राहुल पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित राहुल पाथरवट याने मृत रोहित तडाखे याच्या नावावर बुलेट खरेदी केली होती. त्यानुसार राहुल एका बँकेत वाहन खरेदीचे हप्ते भरत होता. मात्र दोन ते तीन महिने झाल्यानंतर राहुलने गाडीचे हप्ते बँकेत भरले नाहीत.

त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जाच्या हप्त्यासाठी रोहित याच्याकडे तगादा लावला. रोहित याने राहुल याला वारंवार पैसे भरण्याची विनवणी केली. यातून सहा महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये मोठा वादही झाला होता.

दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता. २९) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास राहुलने रोहितला साईट नंबर १०२ मध्ये आंबेडकर मैदानात बोलावून घेतले. मात्र यावेळी यावर तोडगा काढण्याऐवजी रोहितवर राहुलसह त्याचा मित्र व भावाने हल्ला केला.रोहितला हाणामारी करत संदेश पाथरवटने खिशातील एक चाकू बाहेर काढत थेट दंडात भोकसला.

तो चाकू तसाच दंडात रुतला तर मूठ जमिनीवर पडली. तसेच दुसऱ्या चाकूने गळ्यावर सपासप वार केले. या खुनी हल्ल्यात रोहित रक्ताच्या थारोळ्यात मैदानात पडला. हल्ल्यानंतर तिघे पसार झाले. गावभाग पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुख्य संशयित राहुल पाथरवट व संदेश पाथरवट यांना अटक केली.

तर तिसरा संशयित नाथा जावीर याचा पोलिस शोध घेत आहेत. रोहित तडाखे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मारेकरी राहुल पाथरवटही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गावभाग, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी पोलिस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.