Hartalika 2024 : 5 की 6 सप्टेंबर? हरितालिका नेमकी कधी? कोणत्या वयोगटातील स्त्रियांनी करावं व्रत?

स्त्रियांसाठी हरितालिकेच्या (Hartalika Teej 2024) व्रताचं मोठं महत्त्व आहे. पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत पाळलं जातं.हरितालिकेतचं व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे. हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरतात. यंदा हरितालिका (Hartalika Teej 2024 Date) नेमकी कधी? जाणून घेऊया.

हरितालिका नेमकी कधी?

पंचांगानुसार, हरितालिका भाद्रपद शुक्ल तृतीया तिथील साजरी केली जाते. यावर्षी तृतीया तिथी 5 सप्टेंबरला दुपारी 12:21 वाजता सुरू होतेय आणि ती 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 पर्यंत आहे. उदयतिथीनुसार, हरितालिका 6 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे.

कोणत्या स्त्रियांनी करावं हरितालिका व्रत?

हरितालिका व्रत कुमारिका, विवाहित स्त्रिया, याच्यासोबत विधवा स्त्रियाही करतात. हरितालिकेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात. तर चांगला पती मिळावा, यासाठी अविवाहित मुली हे व्रत करतात.

असं मानलं जातं की, शंकर-पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो. अविवाहित मुली चांगला वर मिळावा, म्हणून या दिवशी उपवास करतात. तर विधवा स्त्रिया शिव शंकराची आराधना म्हणून हरितालिकेचं व्रत करतात.

हरितालिका पूजा विधी

हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.

चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी, उपलब्ध फळं, फुलं अर्पण करावी.

यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याची देखील पूजा करावी. आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.