मागील विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भाजप पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. परंतु महायुतीत इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेसाठी गेला. यावेळी शिवसेनेकडे ताकदीचा उमेदवार नव्हता. अखेर आमदार सदाभाऊ खोत, राहुल महाडिक आणि जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी गौरव नायकवडी यांना मातोश्रीवर नेऊन त्यांच्या हाती शिवबंधन बांधले आणि इस्लामपूर मतदारसंघात उमेदवारीही दिली.
दुसरीकडे भाजपमधून इच्छुक असलेल्या निशिकांत पाटील यांना अखेर बंडखोरी करावी लागली. आगामी विधानसभेसाठी महायुतीने अद्याप जागा वाटपाबाबत निर्णय घेतलेला नाही. त्याअगोदरच इस्लामपूर मतदारसंघावर भाजप आणि शिंदेसेनेने दावा केला आहे. शिंदेसेनेतून आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी या दोघांनीही तयारी चालवली आहे.
गुरुवारी जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास गौरव नायकवडी यांची उपस्थिती होती. यानिमित्ताने दोघांनी मिळून उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानून काम करण्याची शपथ घेतली आहे.