हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या दगडूशेठ गणपती मूर्तीचे आगमन झाले. या मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत शेकडो बाल वारकऱ्यांची टाळ मृदुंग व हरिनामाचा गजर करणारी दिंडी काढली.ही दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून निघाली. मंडळाने ही पर्यावरणस्नेही गणेश आगमन मिरवणूक आयोजित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
खुपिरे ता.करवीर येथील वारकरी विद्यापीठाच्या शेकडो बालवारकऱ्यांनी यावेळी केलेला टाळ मृदुंगाचा गजर व त्यावर धरलेला ठेका यामुळे संपूर्ण परिसरात एक अनोखे भक्तिमय वातावरण निर्माण होऊन सर्वत्र एकच नादब्रम्ह निर्माण झाला होता. टाळ मृदुंगाच्या या आवाजातील सूर, लय, सोबतीला अधून-मधून होणारा हरिनामाचा गजर यामुळे या मिरवणुकीला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
डॉल्बीचे थरावर थर लावून कर्णकर्कश आवाजात मिरवणूक काढून आरोग्याच्या समस्या निर्माण करण्यापेक्षा गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणस्नेही उपक्रम राबवल्याने नागरिकांमधून कौतूक होत आहे.