लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील सरुडकर यांच्या पाठिशी संघटितपणे उभे राहून मोठ्या मताधिक्क्याने आपल्या शाहूवाडी तालुक्यातील भूमिपुत्राला निवडून देण्याचा निर्धार शेकापच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर येथे आयोजित निर्धार मेळाव्यात केला.
माजी आमदार सरुडकरांच्या समर्थनार्थ मलकापूर येथे आयोजित बैठकीत बोलताना भारत पाटील म्हणाले की, भाजप संविधानाचा त्याग करून लोकशाही शासनव्यवस्था खिळखिळी करु पाहत आहे.
श्रीमान मोदी म्हणतील तोच कायदा हे लोकशाहीत मतदार कदापि सहन करणार नाहीत. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षितता, शेती आणि शेतकरी आदी महत्वपूर्ण बाबींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आले आहे. मोदींना इतिहासाचा अभ्यास कमी आहे. ते फक्त आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करतात.
म्हणून असे दिशाभूल करणारे मोदीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये यासाठी आपण सर्वांनी सत्यजीत पाटील – सरुडकर यांना विजयी करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन शेकापचे ज्येष्ठ नेते भारत पाटील यांनी केले. यावेळी प्रकाश पाटील, नामदेव पाटील, तुकाराम पाटील, राजेंद्र देशमाने, दगडू झेंडे गुरुजी, शंकरराव चौगुले, बापूसो कुंभार, दस्तगीर आत्तार यांच्यासह शेकापचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.