रविवारी म्हणजेच 8 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी वाकी घे.गावात दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत गावभेट आणि जनसंवाद दौरा केला. दीपकआबांचा जनसंवाद आणि गावभेट दौरा खूपच प्रसिद्धीस येत आहे. सांगोला तालुक्यातील विकासाचे रोल मॉडेल म्हणून वाघी घे. गाव ओळखले जाते. हे छोटेसे गाव असून परंपरेने साळुंखे पाटील परिवाराने या गावावर विशेष लक्ष दिलेले आहे. स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यानंतर स्वर्गीय शारदादेवी साळुंखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जयमालाताई गायकवाड यांनीही या गावावर विकास निधीचा पाऊस पाडला.
वाकी घे. या गावात दीपकआबांच्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. पारंपारिक वाद्यांच्या गजरात, फुलांची उधळण करून, शेकडो महिलांनी औक्षण करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकी घे. गावात दीपकआबा साळुंखे पाटील यांचे स्वागत केले. त्यांनी या गावातील मारुती मंदिर, बुद्धविहार, शिंदेवस्ती, खांडेकरवस्ती, माळी दाईगडेवस्ती, निमग्रेवाडी, दिवसे पवार वस्ती या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.
तसेच रस्ते, पाणी, वीज, आरोग्य याविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि या अडचणीवर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना देखील केल्या. वाकी घे. परिसरातील नागरिकांच्या अडचणी जागेवरून निपटारा केल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.