खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी गेल्या सात-आठ महिन्यापासून जोरदार तयारी केली असतानाच भाजपचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मैदानात उतरण्याची तयारी असल्याचे सांगितल्याने राजकीय उमेदवारीच्या गोंधळात महागोंधळ दिसत आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपामध्ये खानापूर मतदार संघ कोणाला मिळणार हे अनिश्चित असताना देशमुखांची घोषणा म्हणजे अडवाअडवीचे राजकारण तरी नाही ना अशी शंकास्पद स्थिती निर्माण झाली आहे. स्व. अनिल बाबर यांच्या अकाली निधनानंतर बाबर गट एकसंघ ठेवत सुहास बाबर यांनी निवडणुकीची तयारी सुरूच ठेवली असून विरोधक म्हणून विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेच असतील असे गृहित धरून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.माजी नगराध्यक्ष पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष असून महायुतीतून उमेदवारी मिळाली नाही तरी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.
दोन गट ताकदीने निवडणुकीच्या रणांगणात उतरले असताना आटपाडीतील देशमुख वाड्यावरील धावपळ ही कोणाच्या तरी सांगण्यावरून आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे.माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि देशमुख यांनी एकाच वेळी खा. पवार यांची भेट घेतली होती. ही भेट घडवून आणण्यात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा पुढाकार होता.
यामुळे विट्यातील राजकीय डावपेचात निवडून आणण्यापेक्षा पाडापाडीचे राजकारण होते की काय अशी रास्त शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे. खानापूरच्या जागेवर शिंदे शिवसेनेचा दावा राहणार हे स्पष्ट आहे. तर दुसर्या बाजूला महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव पाटील हेही दावा सांगत आहेत.
जागा वाटपात ही जागा कोणाला मिळणार हे अस्पष्ट असले तरी भाजप याठिकाणी दावा सांगण्यास फारसा इच्छुक दिसत नसला तरी गोपीचंद पडळकर यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा सर्व गोंधळाच्या स्थितीत महायुतीमध्येच महागोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याने समजूत कोणाची आणि कोण काढणार हाही प्रश्नच आहे.
