खानापूरमध्ये गणेश मंडळानी राबवला समाज विधायक उपक्रम! ‘डीजे’ला फाटा…..

खानापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीही समाज विधायक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम राखली. खानापूर शहरामध्ये वीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांमार्फत दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही या मंडळाच्यामार्फत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. प्रत्येक मंडळाने परिसरात आकर्षक रोषणाई केली होती.

या गणेश मंडळांनी सामाजिक विषयावर आधारित सजीव देखावे मोठ्या प्रमाणात सादर केले. या सजीव देखाव्यांच्या मार्फत लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. या देखाव्यांत स्थानिक कलाकार भाग घेतात. ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या संघर्ष मित्र मंडळाने सादर केलेला ‘योजनांचा पाऊस, शासनाची हौस’ हा सजीव देखावा परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.

यंदाच्या गणेशोत्सवात खानापूरमध्ये सामाजिक प्रश्नांवर सजीव देखाव्यात भर देण्यात आला आहे. प्रत्येक मंडळाने यावर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचा परिसरातील हजारो गणेश भक्तांनी लाभ घेतला. डीजेला फाटा देत गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे व महिलांसाठी विविध उपक्रम राबवले. एकीकडे डीजेच्या तालावर तरूणाई थिरकत असताना खानापूरमधील तरूणांनी आदर्श निर्माण केला आहे.