जुन्या कागदपत्राची मंगळवेढ्यात शोध मोहीम

सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू केल्यानंतर १२ जानेवारीपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आल्यानंतर मंगळवेढ्यात तहसीलदार मदन जाधव यांनी त्यांच्या कार्यालयाच्या नक्कल विभागात सर्व गावाच्या दप्तराची तपासणी सुरू केली. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी जि. जालना येथे आंदोलन केले.

दरम्यान झालेल्या लाठीमाराने या आंदोलनाचा वनवा राज्यभर पसरला. त्याची अधिक तीव्रत जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यामध्ये दिसून आली. स्वता. जरांगे – पाटील यांची मंगळवेढा येथे जाहीर सभा घेण्यात आली या सभेला शहर व तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी मोठा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दोन वेळा वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला. आंदोलनामुळे मंगळवेढ्याची तीव्रता राज्यभर पोचली.

सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मकता दाखवली असून त्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात आवश्यक असणारे जुने दस्तावेज उपलब्ध करण्याच्या दृष्टीने मंगळवेढा येथे तहसीलदार मदन जाधव यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून या ठिकाणी तहसीलमध्ये नक्कल विभागात उपलब्ध असलेल्या सर्व गावाच्या दप्तराची तपासणी सुरू केली.

नोडल अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांची नियुक्ती केली. यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून या समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (उत्पादन शुल्क ), उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपनिबंधक सहकारी संस्था, मुख्याधिकारी यांचा यामध्ये समावेश केला.